
राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे जनतेला संबोधन; आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर मांडली भूमिका

अमोल मारकवार|तालुका प्रतिनिधी
अहेरी:– अहेरी इस्टेटच्या सुमारे २५० वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपणारा प्रसिद्ध दसरा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या ऐतिहासिक महोत्सवाला अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी उपस्थित प्रचंड जनसमुदायाला संबोधित करत आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सर्व जनतेला दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाच्या मंचावर राजपरिवारातील सदस्य उपस्थित होते.

दसरा महोत्सव हा अहेरीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानला जातो. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेमुळे अहेरीच्या सांस्कृतिक ओळखीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाही नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मी सत्तेत असो किंवा नसो, सदैव तुमच्या सोबत आहे,असे ठामपणे सांगत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी जनतेशी असलेले आपले नाते आणि जनसेवेप्रतीची बांधिलकी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील आरोग्यसेवा, शिक्षणाच्या सुविधा आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर भाष्य केले. दुर्गम भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध होणे आणि युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांच्या संबोधनातून अधोरेखित झाले.
यावेळी त्यांनी दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देताना सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच ऐतिहासिक परंपरा जपत सामाजिक एकोपा आणि बंधुभाव कायम ठेवण्याचे महत्त्वही या उत्सवातून अधोरेखित झाले.
दरम्यान, दसरा महोत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या आरोग्य विभाग, महावितरण आणि पोलीस विभागाचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी विशेष आभार मानले. संबंधित विभागांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडण्यास मदत झाल्याची दखल त्यांनी घेतली. मंचावर राजपरिवारातील सदस्यांची उपस्थिती आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे ऐतिहासिक दसरा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

