
दहा वर्षांच्या मुलींपासून ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांचा सहभाग; तेलुगू, मराठी, हिंदी, गोंडी आणि माडिया गीतांवर महिलांचा ठेका

जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
झिंगानूर : तेलंगणा आणि दक्षिण भारतातील महिलांच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला बतुकम्मा उत्सव झिंगानूर येथील आंबेडकर चौकात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगीबेरंगी फुलांनी सजविलेली बतुकम्मा, पारंपरिक गीते, सामूहिक नृत्य आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. विशेष म्हणजे, ‘एक गाव, एक बतुकम्मा’ या संकल्पनेतून गावातील महिला एकत्र येत हा पारंपरिक उत्सव साजरा करतात.

झिंगानूर येथील आंबेडकर चौकात दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रात्री बतुकम्मा खेळण्याची परंपरा आहे.
या उत्सवात दहा वर्षांच्या लहान मुलींपासून ते ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वजणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. वयाचे बंधन विसरून महिला एकत्र येतात, पारंपरिक गीते गातात आणि फेर धरून नृत्य करतात. त्यामुळे हा उत्सव महिलांसाठी आनंद, उत्साह आणि एकोप्याचा अनमोल सोहळा ठरतो.
रंगीबेरंगी फुलांनी सजते बतुकम्मा!
बतुकम्मा उत्सवाच्या नवव्या दिवशी सकाळपासूनच महिला विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले गोळा करण्यासाठी व्यस्त होतात. या फुलांपासून आकर्षक आणि सुंदर बतुकम्मा तयार केली जाते.
बतुकम्माची सजावट करण्यासाठी दोन ते तीन दिवसांची तयारी केली जाते. विविध रंगांच्या फुलांनी सजविलेली बतुकम्मा ही या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते.
नवरात्रीच्या आठ दिवसांत सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत महिला आंबेडकर चौकात एकत्र येऊन बतुकम्मा खेळतात. नवव्या दिवशी मात्र उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचतो. सायंकाळी डीजेच्या तालावर तेलुगू, मराठी, हिंदी, गोंडी आणि माडिया भाषांतील गीते लावून महिला मनसोक्त नृत्य करतात. पारंपरिक गीतांसोबत आधुनिक संगीताची जोड मिळाल्याने उत्सवात आणखी रंगत येते.
नऊ दिवस महिलांसाठी आनंदाचे पर्व!
बतुकम्मा हा केवळ धार्मिक उत्सव नसून महिलांच्या एकजुटीचा, सांस्कृतिक वारशाचा आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव आहे. वर्षातून एकदा येणाऱ्या या नऊ दिवसांत महिला आपापली दैनंदिन कामे बाजूला ठेवून एकत्र येतात. गाणी, नृत्य आणि हास्यविनोदाच्या माध्यमातून आनंदाचे क्षण अनुभवतात. लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांचा सहभाग या उत्सवाचे वेगळेपण अधोरेखित करतो.
दसरा आणि बतुकम्मा या दोन्ही सणांचा उत्साह झिंगानूरमध्ये एकत्र अनुभवायला मिळतो. नवव्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बतुकम्मा खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सात ते आठ वाजण्याच्या सुमारास पारंपरिक पद्धतीने बतुकम्माचे विसर्जन केले जाते. यानंतर या नऊ दिवसांच्या उत्सवाची सांगता होते.
झिंगानूरच्या आंबेडकर चौकातील बतुकम्मा उत्सव म्हणजे महिलांच्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि एकतेचा जिवंत आविष्कार आहे. ‘एक गाव, एक बतुकम्मा’ या भावनेतून साजरा होणारा हा उत्सव गावातील महिलांना एकत्र आणत असून, नव्या पिढीपर्यंत पारंपरिक संस्कृतीचा वारसा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे.

