
कपेेवंचा येथील घटनेने खळबळ; आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : अहेरी तालुक्यातील कपेवंचा येथे लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बाळाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत पालकांकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपेवंचा येथील संबंधित बालकाला आरोग्य विभागाच्या नियमित लसीकरण मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर काही कालावधीत बाळाची प्रकृती खालावली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेले. मात्र उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर बाळाच्या कुटुंबीयांनी लसीकरणानंतरच प्रकृती बिघडल्याचा दावा करत घटनेची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करण्याची मागणी केली आहे. लसीकरणामुळेच मृत्यू झाला की अन्य कोणत्या वैद्यकीय कारणामुळे ही दुर्दैवी घटना घडली, याचा निष्पक्ष तपास होणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. बालकाच्या उपचाराची पार्श्वभूमी, लसीकरणाचा प्रकार, लसीकरणानंतर दिसून आलेली लक्षणे तसेच उपचारादरम्यानची वैद्यकीय नोंद यांचा तपास केला जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, लसीकरण हे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा साधन आहे. त्यामुळे या घटनेवरून लसीकरणाबाबत भीती निर्माण होऊ नये, तसेच कोणताही निष्कर्ष वैद्यकीय तपासणीपूर्वी काढू नये, असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. मात्र एखाद्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यास त्याची कारणमीमांसा पारदर्शकपणे होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती पालकांसह नागरिकांसमोर स्पष्ट करावी, संबंधित वैद्यकीय नोंदी तपासाव्यात आणि निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. सदर प्रकरणामुळे कपेवंचा परिसरातील पालकांमध्येही चिंता निर्माण झाली असून आरोग्य विभागाच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

