
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : नागरिकांचे चोरीला गेलेले अथवा गहाळ झालेले महागडे मोबाईल शोधून काढण्यात चामोर्शी पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत CEIR पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ७ मोबाईल हस्तगत करण्यात आले. सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे हे मोबाईल मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे तक्रारदार नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चामोर्शी पोलीस ठाणे हद्दीत प्रवासादरम्यान, बाजारपेठेत तसेच शेतात काम करताना नागरिकांचे मोबाईल हरवणे व चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.

या तक्रारींची गंभीर दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष तपास सुरू करण्यात आला. गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्या सल्ल्याने चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे व पोलीस उपनिरीक्षक ललिता सातव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकात पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार व धनंजय मेश्राम यांचा समावेश होता. पथकाने तक्रारदारांच्या मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर नोंदवून तांत्रिक पद्धतीने शोधमोहीम सुरू केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी वापरात असलेल्या हरवलेल्या मोबाईलचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
तपासादरम्यान शोधण्यात आलेल्या मोबाईलपैकी ७ मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. नागरिकांनी चामोर्शी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार करा
मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तसेच CEIR पोर्टलवर मोबाईलचा IMEI क्रमांक नोंदविल्यास हरवलेला मोबाईल शोधण्यास पोलिसांना मोठी मदत होते, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे व पोलीस उपनिरीक्षक ललिता सातव यांनी केले.

