
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी | दि. ८ सप्टेंबर :
आगामी गणेशोत्सव उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पाडावा. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

चामोर्शी येथील बालाजी सभागृहात आज गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना हिरडे बोलत होते. गणेशोत्सव काळात तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या काळात कर्कश आवाज, नियमबाह्य ध्वनिक्षेपकाचा वापर, दारू विक्री अथवा सेवन तसेच जुगाराचे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे हिरडे यांनी स्पष्ट केले. विशेषतः गणेश मंडपात दारू आढळल्यास मंडळाशी संबंधित व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची प्रत्येक मंडळाने दक्षता घ्यावी. मिरवणुकीचे नियोजन करताना पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला वीज वितरण कंपनीचे उपअभियंता देवगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील तसेच तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले. आगामी गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन, पोलीस विभाग आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय ठेवण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

