
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी : येथील मुख्य बस स्टॉप परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय गितेश अशोक वैरागडे हे बस स्टॉपजवळ रस्त्यावरील दुभाजक ओलांडत असताना १८ वर्षीय दुचाकीचालक गितेश विजय कोंडागुर्ले याने त्यांना धडक दिली. या अपघातात वैरागडे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील यशोधन हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, चामोर्शी शहरातील मुख्य रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हत्ती गेटपासून दोषी पेट्रोल पंपापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर अधिकृत यू-टर्नची सुविधा नसल्याने नागरिकांना दुभाजक ओलांडून रस्ता पार करावा लागतो. तसेच काही ठिकाणी दुभाजकांना सुरक्षा कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, दुभाजकांना सुरक्षा कठडे बसवावेत तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य ठिकाणी यू-टर्नची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

