
वाघोली शिवारातील खळबळजनक घटना; डोक्यात धारदार हत्याराने वार – खुनाचे गूढ कायम, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी | दि. ८ सप्टेंबर :

चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात डोक्यात धारदार हत्याराने वार करून एका ३४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला मृताची ओळख पटली नव्हती; मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान मृताची ओळख पटली असून, नंदकिशोर मोतीलाल मिश्रा उर्फ बंटी (वय ३४), रा. तेली मोहल्ला, वॉर्ड क्र. ५, श्रीराम मंदिराजवळ, मुल, ता. मुल, जि. चंद्रपूर असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास चामोर्शी ते मुल मार्गावरील रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या मौजा वाघोली शिवारात ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने नंदकिशोर मिश्रा यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
मृताची ओळख पटल्याने तपासाला गती
घटनेनंतर मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मृताचे वर्णन पोलिसांनी जाहीर करून नागरिकांकडून माहिती मागवली होती. मृताच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट, गळ्यात चांदीची चैन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ आणि पायात पॅरागॉन कंपनीची प्लास्टिक चप्पल होती.
आज मृताचे नातेवाईक चामोर्शी येथे दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर नंदकिशोर मिश्रा उर्फ बंटी यांची ओळख निश्चित झाली. त्यामुळे आता या खुनाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळण्याची शक्यता आहे.
‘कोणी आणि कशासाठी?’ याचे गूढ कायम
मृताची ओळख पटली असली तरी नंदकिशोर मिश्रा यांचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हत्येमागील कारण, आरोपीची ओळख आणि खुनामागील नेमके रहस्य उलगडण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या प्रकरणात वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मृताचे नातेवाईक तसेच इतर काही संशयितांकडे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. घटनास्थळावरील पुरावे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात येत आहे.
या खळबळजनक हत्येचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान चामोर्शी पोलिसांसमोर आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

