
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या दौऱ्यात महत्त्वपूर्ण निर्णय; जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून शाळांचा सर्वांगीण विकास
हालेवारा-तोडसा आश्रमशाळांसह बुर्गी-पैमा जि.प. शाळांचा समावेश; डिजिटल लायब्ररी, स्मार्ट
वर्गखोल्या, वसतिगृह, क्रीडांगणासह सौरऊर्जेची सुविधा

जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली | दि. ७ सप्टेंबर :
आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यातील हालेवारा व तोडसा येथील दोन आश्रमशाळा तसेच बुर्गी व पैमा येथील दोन जिल्हा परिषद शाळांचा ‘मॉडेल शाळा’ म्हणून सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या चारही शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या ४ सप्टेंबर रोजी झालेल्या एटापल्ली तालुका दौऱ्यादरम्यान शैक्षणिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा गावाजवळ उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
शाळा म्हणजे केवळ इमारत नव्हे; सर्वांगीण विकासाचे केंद्र!
या उपक्रमात केवळ शाळांच्या इमारतींचे सुशोभीकरण करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास, क्रीडा, वाचन, डिजिटल तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे वातावरण निर्माण केले जाणार आहे.
मॉडेल आश्रमशाळांमध्ये अत्याधुनिक वर्गखोल्या, सुसज्ज वसतिगृह, प्रशस्त डायनिंग हॉल, बहुउद्देशीय सभागृह, क्रीडांगण आणि डिजिटल लायब्ररी यांसारख्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी डिजिटल सुविधांवर विशेष भर दिला जाणार आहे.
सौरऊर्जा अन् रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे शाळा होणार पर्यावरणपूरक
शाळांचा विकास करताना पर्यावरणाचा समतोलही जपला जाणार आहे. यासाठी सौरऊर्जा प्रणाली आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांच्या पायाभूत सुविधांसोबतच शाश्वत विकासालाही चालना मिळणार आहे.
दुर्गम विद्यार्थ्यांसाठी शहराच्या धर्तीवर सुविधा
एटापल्ली तालुक्यातील अनेक गावे आजही दुर्गम भागात आहेत. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या अंतरावर जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
शहरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आता दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणार असल्याने ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पटसंख्या, उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेला मिळणार बळ
सुसज्ज वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण, चांगली निवासी व्यवस्था, क्रीडा सुविधा आणि वाचनासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच अधिक चांगले शिक्षणपूरक वातावरण मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शाळेतील सहभाग आणि पटसंख्या वाढण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्तेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
एटापल्लीच्या शिक्षण क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात
हालेवारा, तोडसा, बुर्गी आणि पैमा या चार शाळांचा मॉडेल शाळांच्या धर्तीवर होणारा विकास हा एटापल्लीच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. डिजिटल शिक्षण, क्रीडा, वाचन, तंत्रज्ञान, निवास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्यास दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मोठी झेप मिळू शकते.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीचा उपयोग करून होणारा हा उपक्रम एटापल्लीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करणारा आणि दुर्गम भागातील शाळांच्या कायापालटाचा पथदर्शी नमुना ठरण्याची अपेक्षा आहे.

