
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी /भेंडाळा| दि. ८ सप्टेंबर २०२६ :
चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात एका अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अज्ञात इसमाचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी ते मुल मार्गावरील रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर, मौजा वाघोली शिवारात दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने संबंधित इसमाच्या डोक्यात काहीतरी धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिसांनी त्याचे वर्णन जाहीर केले आहे.
वय: अंदाजे ३० ते ३५ वर्षे
उंची: सुमारे साडेपाच फूट
रंग: गोरा
शरीरयष्टी: सडपातळ
अंगात: काळ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट
गळ्यात: चांदीची चैन
डाव्या हातात: काळ्या रंगाचे घड्याळ
पायात: पॅरागॉन कंपनीची प्लास्टिक चप्पल
या वर्णनाचा कोणताही इसम आपल्या परिसरातून बेपत्ता असल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ चामोर्शी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला? मृत व्यक्ती कोण आहे? तसेच या हत्येमागे कोणाचा हात आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही, संभाव्य पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे. घटनेमुळे चामोर्शी परिसरात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

