
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची विशेष उपस्थिती; मंत्रोच्चार, शंखनाद अन् ‘हर हर महादेव’च्या गजराने परिसर दुमदुमला
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी | दि. ७ सप्टेंबर :

उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील प्राचीन मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडा येथे श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. वैनगंगेच्या पावन तीरावर आयोजित भव्य महागंगा पूजा व महाआरती सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. शंखनाद, डमरूचा निनाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मार्कंडा नगरी दुमदुमून गेली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या विशेष पुढाकारातून या अभिनव धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले
मार्कंडेश्वराचे दर्शन घेत डॉ. अशोक नेते यांनी केली पूजा-अर्चा
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी परिवारासह मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मार्कंडेश्वर ऋषींची विधिवत पूजा-अर्चा व आरती केली. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता उत्तरवाहिनी वैनगंगेच्या पवित्र तीरावर मुख्य महागंगा पूजेला सुरुवात झाली.
पुरोहितांच्या मंत्रोच्चारात ‘ॐ नमः शिवाय’ आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण, दीपप्रज्वलन आणि विधिवत गंगापूजन करण्यात आले. यानंतर झालेल्या भव्य महाआरतीने वातावरण अक्षरशः भारावून गेले. शेकडो दीपांच्या प्रकाशाने वैनगंगेचा पवित्र तीर उजळून निघाला, तर भाविकांच्या ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले.
‘हा ऐतिहासिक आणि दिव्य सोहळा’ – डॉ. अशोक नेते
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी खासदार डॉ. अशोक नेते म्हणाले की, मार्कंडेश्वर ऋषींचे विधिवत दर्शन आणि पूजा-अर्चा करण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. वैनगंगेच्या पावन तीरावर भव्य गंगा महापूजा होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा ऐतिहासिक व दिव्य सोहळा साकार होत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. या धार्मिक उपक्रमामुळे मार्कंडा देवस्थानचे आध्यात्मिक वैभव अधिक वृद्धिंगत झाले असून परिसराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
या भव्य महागंगा पूजा व महाआरती सोहळ्यास विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजपा तालुका अध्यक्षा रोशनी वरघंटे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, मार्कंडेश्वर समिती अध्यक्ष गजानन भांडेकर यांच्यासह संजय बारापात्रे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, रेवनाथ कुसराम, नरेश अल्सावार, केशव निंबोड, शेषराव कोहळे, विशाल माडवे तसेच मुरलीधर महाराज, अन्य महाराज, साधू-संत, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्कंडा देवस्थानच्या आध्यात्मिक वैभवात नवा अध्याय
श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी वैनगंगेच्या तीरावर झालेल्या या भव्य महागंगा आरतीने मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात नवा अध्याय जोडला गेला आहे. प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराच्या अध्यात्मिक महत्त्वाला वैनगंगेच्या महाआरतीची जोड मिळाल्याने या तीर्थक्षेत्राचे आकर्षण आणखी वाढले आहे.
आरतीच्या वेळी निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दीपांच्या रोषणाईने उजळलेला वैनगंगेचा तीर, घुमणारा शंखनाद आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला. महाआरतीनंतर उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

