
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली | दि. ७ सप्टेंबर :
नैसर्गिक साधनसंपत्ती, समृद्ध वनसंपदा, बांबू, कृषी उत्पादन, वनौषधी, पर्यटन आणि सक्षम मानवी संसाधने ही गडचिरोली जिल्ह्याची मोठी ताकद आहे. या उपलब्ध क्षमतांना योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धनाची जोड देत जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

या व्हिजनच्या माध्यमातून गडचिरोलीचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्याचा संकल्प करण्यात आला असून, या विकास आराखड्याची माहिती सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सर्किट हाऊस, गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार आणि ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी, “हे केवळ कागदावरील व्हिजन नसून गडचिरोलीच्या भविष्यासाठी सामूहिक सहभागातून उभा राहणारा विकासाचा संकल्प आहे,” असे स्पष्ट केले.
दोन दिवसांच्या मंथनातून विकासाची दिशा
गडचिरोलीच्या विकासाचे दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी दि. १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यशाळेत शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती व सिंचन, उद्योग व गुंतवणूक, पर्यटन, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवक व क्रीडा, वनाधारित अर्थव्यवस्था, ग्रामविकास, PESA व वनहक्क तसेच आदिवासी विकास अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
स्थानिक गरजा, उपलब्ध साधनसंपत्ती आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून मान्यवरांनी मांडलेल्या सूचना व संकल्पनांच्या आधारे पुढील पिढ्यांसाठी विकासाची दिशा निश्चित करणारा आराखडा तयार करण्यात आला आहे.
स्थानिक साधनसंपत्तीला मूल्यवर्धनाची जोड
गडचिरोलीकडे असलेल्या नैसर्गिक आणि मानवी संपत्तीचे योग्य नियोजन केल्यास जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असे डॉ. देवराव होळी यांनी सांगितले.
बांबू, वनउत्पादने, कृषीमाल, वनौषधी आणि इतर स्थानिक साधनसंपत्तीवर जिल्ह्यातच प्रक्रिया व मूल्यवर्धन झाले, तर स्थानिक पातळीवर उद्योग उभे राहून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना, गुंतवणुकीला प्रोत्साहन, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि पर्यटन विकास यावर व्हिजनमध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
शिक्षण, आरोग्यापासून उद्योग-पर्यटनापर्यंत व्यापक नियोजन
गडचिरोलीच्या विकासाचा विचार केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, सिंचन, उद्योग, गुंतवणूक, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा समन्वित विकास करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यात मांडण्यात आले आहे.
यासोबतच महिला व युवकांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या कौशल्यांना आणि क्षमतांना संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. वनाधारित अर्थव्यवस्थेला बळकटी देताना स्थानिक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शाश्वत विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हा वर्धापन दिनी व्हिजनचे सादरीकरण
दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकार परिषदेद्वारे या विकास आराखड्याची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच गडचिरोलीच्या भविष्यातील विकासासाठी व्यापक लोकसहभाग निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
“गडचिरोलीच्या विकासासाठी सामूहिक संकल्पाची गरज”
‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा उपक्रम नसून संपूर्ण जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन उभारलेला विकासाचा संकल्प आहे, असे डॉ. होळी यांनी स्पष्ट केले.
स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि भविष्यातील संधी यांचा समन्वय साधून गडचिरोलीला सक्षम, स्वावलंबी, रोजगारक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्याच्या दिशेने या आराखड्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, माजी पं.स. उपसभापती विलास देशमुखे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, शहराध्यक्ष आरती कोल्हे, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, काशिनाथ देवघडे, योगेश कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

