
महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या पुढाकाराने आयोजन; शेतकरी, युवक, महिला व नागरिकांची मोठी उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली | दि. ७ सप्टेंबर :

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघर्ष कृती समिती, गडचिरोली यांच्या वतीने आणि महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या पुढाकाराने श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे भव्य महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी झालेल्या या महाअभिषेक सोहळ्याला शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे श्री मार्कंडेश्वर महादेवाचा विधिवत महाअभिषेक करण्यात आला. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नावर न्याय मिळावा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, खतांचा प्रश्न सुटावा, सिंचनाच्या सुविधा वाढाव्यात, रस्ते व आरोग्य व्यवस्था सुधारावी, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच महिलांच्या सुरक्षिततेसह जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी श्री मार्कंडेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.
जमीन अधिग्रहणासह अनेक प्रश्न प्रलंबित
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असतानाही स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतीमालाला मिळणारा भाव, सिंचन, खतांचा पुरवठा, रस्ते, रोजगार आणि आरोग्य यांसारखे प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
महाअभिषेकाच्या माध्यमातून केवळ धार्मिक श्रद्धा व्यक्त न करता शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी एकजुटीचा संदेश देण्यात आला. शासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या महाअभिषेक सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस पराग पास्ते, वानखेडे (अमरावती), माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस नेते ॶॅड. दुष्यंत नामदेव किरसान, नगरसेवक सतीश विधाते, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सलोटकर, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर यांच्यासह दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, विजय लाड,कविताताई भगत, तात्याजी चीचघरे, विजयानंद महाराज रोडे, नदीम नाथानी, हरबाजी मोरे, गौरव येनप्रेड्डीवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, राज बोदलकर, विलास चीचघरे, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत, संजय बुरांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे सहपदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, युवक आणि महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका अधिक तीव्र करण्याचा निर्धार आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने आवाज उठविण्याचा संदेश या महाअभिषेक सोहळ्यातून देण्यात आला.

