
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/आरमोरी | दि. ७ सप्टेंबर :
बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाचा हुंकार देत बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आरमोरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभागृह अक्षरशः खचाखच भरले होते. मेळाव्यातून संघटन मजबूत करण्यासोबतच संविधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
स्मृतिशेष प्राचार्य मधुकर बन्सोड यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे सुपुत्र यशपालजी बन्सोड यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील बहुजन समाज पक्षाच्या बोर्डाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे सभागृहात आगमन झाले.
मेळाव्यास बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव डॉ. मोहन रायकर, मुस्लिम भाईचारा कमिटी विदर्भ इन्चार्ज मोहसीन खान, वर्धा संघटिका महिला आघाडी डॉ. विद्याताई गायकवाड, इंजि. दादाराव उईके, प्रदेश लीगल ॲडव्हायझर ॲड. संजय पाटील, जिल्हा प्रभारी प्रा. विजय दुपारे, माजी प्रदेश सचिव रमेश मडावी, माजी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, माजी जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट तसेच पदवीधर मतदारसंघाचे बसप उमेदवार संजय थूल यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर जोरदार मंथन
मेळाव्यात SC/ST उपवर्गीकरण, OBC जातनिहाय जनगणना, नवीन शैक्षणिक धोरण, PESA कायदा, सामाजिक न्याय तसेच बहुजन समाजाचे राजकीय सक्षमीकरण या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटित शक्ती उभी करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
“संघटन हीच बहुजन समाजाची खरी ताकद” या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवावी, संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढावे आणि बहुजन समाजाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यकर्त्यांना पदांची जबाबदारी; संघटन विस्ताराला वेग
मेळाव्यात वडसा व आरमोरी तालुका संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांमुळे तालुक्यात पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात संघटन विस्ताराला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बहुजन समाजाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून संघटितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
संविधानिक मूल्यांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करत सत्ता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडसा शहराध्यक्ष आशिष रमेश घुटके यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरमोरी विधानसभा अध्यक्ष राजेश लिंगायत यांनी केले.
मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
आरमोरीतील या जिल्हास्तरीय मेळाव्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन विस्तार आणि आगामी राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. बहुजन समाजाच्या हक्कांसाठी व्यापक संघटन उभे करून आगामी काळात अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.

