
पुलाच्या मागणीसाठी प्रत्यक्ष पाहणी; अभियंत्यांना अंदाजपत्रक तयार करण्याच्या तात्काळ सूचना
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली/धानोरा | दि. ६ सप्टेंबर :

“समस्या सोशल मीडियावर आली आणि आमदार थेट घटनास्थळी पोहोचले!” या कृतीमुळे धानोरा तालुक्यातील मंगेवाडा टोला येथील ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.मंगेवाडा टोला येथील ग्रामस्थांनी नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जीवघेण्या अडचणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या व्हिडिओची तात्काळ दखल घेत आमदार रामदासजी मसराम यांनी विलंब न करता मंगेवाडा टोला येथे प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांसह रुग्ण, गर्भवती महिला, वृद्ध आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत असल्याची गंभीर वस्तुस्थिती यावेळी आमदारांच्या निदर्शनास आली. त्यामुळे पुलाची मागणी ही केवळ विकासकामाची नसून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेशी आणि जीवन-मरणाच्या प्रश्नाशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले.
अभियंत्यांना तात्काळ सूचना; पुलाच्या कामाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू
परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आमदार रामदासजी मसराम यांनी संबंधित अभियंत्यांशी दूरध्वनीवरून तात्काळ चर्चा केली. पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
कामाला अनावश्यक विलंब होऊ नये आणि मंगेवाडा टोला येथील ग्रामस्थांची वर्षानुवर्षांची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाहीही आमदारांनी ग्रामस्थांना दिली.
नाला ओलांडताना ग्रामस्थाचा मृत्यू; पुलाची गरज झाली अधिक गंभीर
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी असताना सदाराम होळी या ग्रामस्थाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेने मंगेवाडा टोला येथील पुलाचा प्रश्न किती गंभीर आणि तातडीचा आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.
रस्ता, पाणीटंचाईसह मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरही चर्चा
पुलासोबतच ग्रामस्थांनी रस्ता, पाणीटंचाई आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या. आमदारांनी ग्रामस्थांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भावनिक होत ग्रामस्थांनी, “आमच्या गावात पहिल्यांदाच आम्ही आमदार बघितला,” अशी भावना व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मंगेवाडा टोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणारे पहिले आमदार म्हणून रामदास मसराम यांचा उल्लेखही ग्रामस्थांनी केला.
“पूल होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील”
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केवळ प्रतिक्रिया न देता थेट गावात पोहोचणे, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणे आणि समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू करणे, यामुळे आमदार रामदास मसराम यांच्या भूमिकेची चर्चा होत आहे.
यावेळी आमदार रामदास मसराम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले
“ग्रामस्थांची समस्या हीच माझी समस्या आहे. मंगेवाडा टोला येथे पूल होईपर्यंत आवश्यक तो पाठपुरावा सुरूच राहील.”
यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, कमलेश बारस्कर, श्रीकांत कुमरे, सुधाकर तुलावी, श्रावण नरोटे, रामसिंग हरामी, अनिल नरोटे, सुधाकर होळी, शामराव होळी, सन्नू नरोटे, दशरथ गावडे, आसाराम होळी, भजनराव मडावी, वर्षा कुमरे, लक्ष्मी होळी, संतो मडावी, सुनीता नरोटे, सौ. जयवंता मडावी, सौ. निर्मला होळी, सीता होळी, जुनाय कुमोटी,रसिका होळी, हिराबाई हरामी, वचलाबाई होळी, सरजाबाई मडावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

