
चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ त्रस्त; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली /चामोर्शी | दि. ६ सप्टेंबर :

केवळरामजी हरडे कॉलेज आफ एग्रीकल्चर चामोर्शी येथे महाविद्यालयाकडे जाणाऱ्या खराब व चिखलमय रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी रविवारी आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून ये-जा करावी लागत आहे.
रस्त्यावर मुरूम टाकल्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी रस्त्याची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. पावसामुळे मुरूम चिखलात मिसळून संपूर्ण मार्गावर दलदल निर्माण झाली असून, दुचाकीस्वार घसरून पडण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
भिवापूर, वलसरा आणि आमगाव परिसरातील ग्रामस्थांसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले
यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या परिसरात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी सुरक्षित व पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
“कारवाई झाली नाही तर रास्ता रोको!”
प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जर प्रशासनाकडून लवकरात लवकर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून, प्रशासनाने आता तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांकडून होत आहे.

