
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली | दि. ६ सप्टेंबर:
जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांच्या हक्काची तसेच पिढ्यान्पिढ्या जपलेली सुपीक जमीन धोक्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि गडचिरोलीच्या भवितव्यासाठी मार्कंडादेव येथे महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे हे महाअभिषेक होणार आहे. या अभिषेकाच्या माध्यमातून जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाम भूमिका मांडली जाणार आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर “शेती वाचवा, जिल्हा वाचवा!” असा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, “शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी, गडचिरोलीच्या भविष्यासाठी आणि आपल्या मातीच्या रक्षणासाठी चला, एकत्र येऊया!” असे आवाहन करण्यात आले आहे.
‘जमीन आमची, जीवन आमचं’चा नारा
शेतजमीन ही केवळ उपजीविकेचे साधन नसून शेतकरी कुटुंबांच्या जीवनाचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा आधार आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवारी मार्कंडादेव येथे होणाऱ्या महाअभिषेकाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले असून, शेतकरी आपल्या हक्कासाठी किती मोठ्या संख्येने एकवटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

