
रक्त व प्लेटलेट्सची कमतरता, पोटात तीन बाळे; कुटुंबाचा रुग्णालयात जाण्यास नकार, आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी टळला मोठा धोका
एटापल्ली : आरोग्य विभागाकडून संस्थात्मक प्रसूतीसाठी सातत्याने जनजागृती व समुपदेशन करण्यात येत असले, तरी एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागात आजही काही गर्भवती महिला रुग्णालयात प्रसूती करण्यास सुरुवातीला नकार देत असल्याचे चित्र आहे. मात्र आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण समुपदेशनामुळे अनेक मातांना रुग्णालयात दाखल करून सुरक्षित प्रसूती करण्यात यश येत आहे. याचाच प्रत्यय नुकताच हेडरी येथे आला.
दि. २२ ऑगस्ट रोजी शांता सुनील गावडे (वय ३२) या अतिहाय-रिस्क गर्भवती मातेची हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सिझेरियनद्वारे सुखरूप प्रसूती झाली. या प्रसूतीत मातेने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला.

शांता गावडे यांचे सासर एटापल्लीजवळील पंदेवाही येथे असून, त्या २६ जुलै रोजी माहेरी मंगेर येथे गेल्या होत्या. पंदेवाही येथे असताना आशा कार्यकर्त्या माया कांबडे त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेत होत्या. माहेरी गेल्यानंतर पंदेवाही येथील आशा कार्यकर्त्यांनी मंगेर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
यानंतर हेडरी येथील गटप्रवर्तक रश्मी पित्तूलवार तसेच मंगेर येथील आशा कार्यकर्त्या महेश्वरी केरकेट्टा व शितल लेकामी यांनी मातेच्या घरी भेटी देण्यास सुरुवात केली. सोनोग्राफी व इतर वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर मातेच्या पोटात तीन बाळे असल्याचे, तसेच रक्त व प्लेटलेट्सची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ही गर्भावस्था अतिहाय-रिस्क असल्याचे स्पष्ट झाले.
गटप्रवर्तकांनी ही बाब डॉ. भूषण चौधरी तसेच गट्टा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितेश वड्डे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कुटुंबीयांना वारंवार रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र घरातील दोन लहान मुले, शेतीची कामे आणि घरी देखभाल करण्यासाठी कोणी नसल्याचे कारण देत कुटुंबीय सुरुवातीला रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते.
मातेची परिस्थिती गंभीर असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली. मात्र गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि हेडरी उपकेंद्रातील एएनएम करपेत यांनी कुटुंबीयांचे सातत्याने समुपदेशन सुरू ठेवले. याचदरम्यान हेडरी येथील लॉयड्स हॉस्पिटलमधील डॉ. रजनीकांत तिवारी यांची भेट घेऊन मातेची संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात आणण्याचा विश्वास दिल्यानंतर अखेर १० ऑगस्ट रोजी शांता गावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तब्बल १२ दिवसांच्या वैद्यकीय देखरेखीनंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि २२ ऑगस्ट रोजी सिझेरियनद्वारे तिळ्यांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली.“ही १५ दिवसांची अत्यंत चिंतेची परिस्थिती होती. दररोज घरभेट देऊन कुटुंबीयांचे समुपदेशन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे माता आणि तिन्ही बाळांना सुरक्षितपणे रुग्णालयात उपचार मिळू शकले,” अशी भावना आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
संस्थात्मक प्रसूतीमुळे माता व नवजात बालकांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. दुर्गम भागातील गर्भवती मातांनी प्रसूतीपूर्व तपासण्या करून आवश्यक वेळी रुग्णालयात दाखल व्हावे, यासाठी आशा कार्यकर्त्या व आरोग्य विभागाचे समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

