
८ सप्टेंबरला चित्तरंजनपूर येथे सर्वपक्षीय सभा; शेतकरी, शेतमजूर, महिला व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : येणापूर-जयरामपूर परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १३ गावांतील शेतकरी व नागरिकांच्या जमिनींच्या भूसंपादनाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, हे भूसंपादन कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रस्तावित भूसंपादनामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या शेती, उपजीविका, रोजगार, जलस्रोत, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या ५ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार बाधित शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी कालावधी वाढविण्यात आला असून, मुख्यमंत्री यांच्या अंतिम निर्णयापर्यंत भूसंपादनाची पुढील प्रक्रिया स्थगित ठेवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नावर सर्वपक्षीय एकजूट निर्माण करण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
८ सप्टेंबरला निर्णायक बैठक
८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजनपूर (येणापूर) येथे ही सर्वपक्षीय सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. “१३ गावांचा निर्णय – प्रस्तावित भूसंपादन कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय भूमिका” हा सभेचा मुख्य विषय राहणार आहे.
या सभेत शेतकऱ्यांच्या समस्या व भावना प्रत्यक्ष मांडून भूसंपादनाविरोधात ठोस व एकत्रित भूमिका निश्चित करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे. केवळ राजकीय कार्यक्रम म्हणून नव्हे, तर १३ गावांच्या अस्तित्वाचा आणि शेतकऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून सर्व राजकीय पक्षांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आता पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” अशी भावना आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
१३ गावांतील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

