
‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी; बूथस्तरावरील संघटन बळकटीकरणावर भर
जिल्हा प्रतिनिधी| नितेश गट्टीवार
गडचिरोली | दि. ६ सप्टेंबर :भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा चामोर्शी तालुक्याची मासिक बैठक चामोर्शी येथील आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. २ जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे होते, तर चामोर्शी तालुका प्रभारी तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणेचे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानच्या विविध उपक्रमांचे नियोजन, बूथस्तरावरील संघटनात्मक तयारी आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बूथस्तरावर संघटन मजबूत करण्याचे आवाहन
यावेळी इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी मार्गदर्शन करताना, ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम बनवावे, असे आवाहन केले. सेवा, जनसंपर्क आणि संघटनवाढ या तिन्ही बाबींना प्राधान्य देत प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करण्याचे त्यांनी सांगितले.
SIR नुसार दि. १ सप्टेंबर रोजी प्रत्येक बूथवरील मतदारांची यादी प्रकाशित करण्यात आली असून, या यादीमध्ये आपल्या पक्षाशी संबंधित नागरिकांची नावे आहेत का, याची बूथस्तरावर तपासणी करावी. ज्या नागरिकांची नावे यादीतून सुटली आहेत, त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. १ सप्टेंबर ते ३१ सप्टेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी शासकीय BLO यांच्याकडे फॉर्म क्रमांक १६ भरून देण्यात यावा, अशी माहितीही त्यांनी दिली.
बूथस्तरावरील संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पिपरे यांनी केले.
जनसेवा आणि संघटनबळावर भाजपाचा भर
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांनी मार्गदर्शन करताना ‘सेवा संकल्प अभियानातील प्रत्येक उपक्रमाचे प्रभावी नियोजन करून बूथप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथस्तरावरील संपर्क अधिक व्यापक करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
जनसेवा आणि मजबूत संघटनबळाच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यात भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाचा निर्धार
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘स्वप्नांचा भारत’, चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’ नाटक सादरीकरण, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, ‘सेवा दीप यात्रा’, ‘सेवा सेतू अभियान’, ‘सेवा व आपले योगदान’, रांगोळी स्पर्धा, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ‘इनोव्हेशन चॅलेंज’, ‘जनसेवेचा महाकुंभ’, पवित्र जल संकलन तसेच वडनगर ते वाराणसी यात्रा आदी विविध उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
बैठकीला तालुका अध्यक्षा श्रीमती रोशनीताई वरघंटे, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भुवनेश्वर चुधरी, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ. कविताताई किरमे, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, माधवी पेशेट्टीवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बूथप्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी ‘सेवा संकल्प अभियान’ चामोर्शी तालुक्यात प्रभावी, व्यापक आणि लोकाभिमुख पद्धतीने राबवून जनसंपर्क वाढविण्यासोबतच पक्षाची बूथस्तरावरील संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

