
भेंडाळ्यात ६३ हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान; मोफत ईसीजी तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांची उपस्थिती
प्रलय सहारे| प्रतिनिधी
भेंडाळा : वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि शुभेच्छांचा सोहळा न ठेवता, तो समाजोपयोगी कार्यासाठी समर्पित करण्याचा प्रेरणादायी आदर्श अतुल गण्यारपवार यांनी घालून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गण्यारपवार फाऊंडेशन व सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडाळा येथील किसान भवनात भव्य रक्तदान व मोफत ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील युवक, नागरिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’—६३ हून अधिक युनिट रक्तसंकलन
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन व सत्कार करून गौरव करण्यात आला.
हृदयाच्या आरोग्यासाठी मोफत ईसीजी तपासणी
वाढत्या हृदयरोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत ईसीजी तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. वेळेवर आरोग्य तपासणीचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले.
वाढदिवसाचा खर्च टाळून समाजसेवेचा संदेश
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्याऐवजी रक्तदान, आरोग्य तपासणी आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत समाजासाठी प्रेरणादायी असून इतरांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे,” अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या सामाजिक उपक्रमासाठी गण्यारपवार फाऊंडेशन, चामोर्शी, त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, मोहाळी (मो.), भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, मुरखळा माल तसेच भेंडाळा व परिसरातील ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र जुवारे, कुंदाताई जुवारे, रुपालीताई दहेलकर, नामदेव पाटील किनेकर, शामराव पाटील पोरटे, भगिन्द्र झाडे, प्रमोद गोरलावार, प्राचार्य जे. विलास सर, हरीश गेडाम सर, शिवाजी मंडळ भेंडाळा, संदीप रुमाजी आभारे, अनिल आभारे, उत्साही गणेश मंडळ भेंडाळा, वीर शिवाजी मंडळ घारगाव, सुनील आभारे, लोभेश गोरलावार, संदीप बट्टे, चेतन गोरलावार, श्रावण मेश्राम, पुरुषोत्तम चापले, सुशील बंडावार, मंगेश हुमणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, स्थानिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
वाढदिवसाच्या आनंदाला समाजसेवेची दिशा देत रक्तदान आणि आरोग्य तपासणीच्या माध्यमातून दिलेला हा संदेश निश्चितच अनुकरणीय ठरला असून, भेंडाळा परिसरात या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

