
भामरागड, दि. 24 ऑक्टोबर २०२६ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड येथे आयोजित कार्यक्रमात ऑगस्ट २०२६ महिन्यासाठी विनोबा ॲपच्या विभागस्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्रे व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागडचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (योजना) श्री. प्रशांत नगराळे साहेब होते. यावेळी मा. राकेश डोंगरे साहेब तसेच विनोबा ॲपचे प्रकल्प अधिकारी निखील गजभीये उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत व्यंकटेश एल. बोमकंटीवार (अनु. विनोबा प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळा, पंदेवाही), सविता सोनटक्के (भगवंतराव आश्रमशाळा, भामरागड) आणि माहेश्वरी करेवार (लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा) या तीन शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रशांत नगराळे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कठोर परिश्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी असेच समर्पणाने कार्य करत राहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विनोबा ॲपकडून मिळालेल्या प्रमाणपत्रांबद्दल व शैक्षणिक साहित्याबद्दल आभार व्यक्त केले. शिक्षकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहकार्य उपलब्ध करून देण्यासोबतच आधुनिक शिक्षण तंत्रज्ञान व अध्यापन पद्धतींची माहिती देण्यात विनोबा ॲप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली असून, त्यांच्या उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन मिळत आहे. शिक्षकांच्या कार्याची दखल घेणाऱ्या अशा उपक्रमांमुळे आदिवासी भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विनोबा ॲपच्या या उपक्रमातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

