
सोमवारी गडचिरोलीत काँग्रेसचा शक्तिप्रदर्शनाचा निर्धार; जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांबाबत जनजागृती आणि संघटनात्मक बळकटीकरणासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री तथा राजपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार बाळा बच्चन प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला अधिक बळकट करण्यासोबतच ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ अभियानाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत अभियानाची दिशा, संघटनात्मक कार्याचा आढावा आणि आगामी काळातील पक्षाच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या संवाद बैठकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी खासदार व आमदार, सेलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी जनजागृतीचा संदेश अधिक व्यापक करण्यासोबतच जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या बैठकीतून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
बैठकीचा तपशील: सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६
वेळ : दुपारी १२ वाजता
स्थळ : विहान हॉल, आर.के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

