
‘रेला’ नृत्यातून आदिवासी संस्कृतीसह शांततेचा संदेश
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख मागे सारत गडचिरोलीची समृद्ध आदिवासी संस्कृती आता देशाच्या राजधानीत अभिमानाने झळकली आहे. दिल्ली येथे आयोजित ९ व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवलमध्ये गडचिरोलीच्या युवक-युवती तसेच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी आपल्या पारंपरिक कलेचे दमदार सादरीकरण करत राष्ट्रीय मंचावर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाची प्रभावी छाप उमटवली.

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत ४ आत्मसमर्पित माओवादी सदस्य आणि अनुप डान्स ग्रुपच्या १४ युवक-युवती, अशा एकूण १८ सहभागी कलाकारांनी दिल्लीमध्ये पारंपरिक वाद्यांच्या साथीने ‘रेला’ नृत्याचे मनमोहक सादरीकरण केले. त्यांच्या या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकत गडचिरोलीच्या आदिवासी लोकपरंपरेचा आवाज देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचविला.
कलेतून परिवर्तनाचा नवा अध्याय!
दि. ८ सप्टेंबर रोजी या सहभागींचा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्कृष्ट सहभागाबद्दल कलाकारांना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत, “या कलाकारांचे सादरीकरण हे केवळ नृत्य नसून गडचिरोलीच्या परिवर्तनाची, शांततेची आणि नव्या आशेची ओळख आहे,” असा गौरवोद्गार काढला.
‘रेला’च्या तालावरून गडचिरोलीची आदिवासी संस्कृती, लोकपरंपरा, कला आणि अस्मिता दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर पोहोचली. त्याचबरोबर शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेशही या माध्यमातून देशभर देण्यात आला.
आत्मसमर्पित सदस्यांच्या आयुष्याला नवी दिशा
एकेकाळी हिंसेच्या वाटेवर गेलेल्या आत्मसमर्पित सदस्यांना कला, संस्कृती आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून होत आहे.
दिल्लीसारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या पारंपरिक कलेचे सादरीकरण करण्याची मिळालेली संधी ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी घटना ठरली.
यावेळी आत्मसमर्पित सदस्यांनी अतिदुर्गम गडचिरोलीतून देशाची राजधानी दिल्लीपर्यंत आपली पारंपरिक कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
गडचिरोलीच्या मातीत रुजलेली कला आता दिल्लीच्या मंचावर दुमदुमत आहे—हा केवळ सांस्कृतिक गौरव नसून शांतता, परिवर्तन आणि नव्या भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीची प्रेरणादायी कहाणी आहे!

