
विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती; महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.९सप्टेंबर : आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.

महा मॅरेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र आणत आरोग्यदायी जीवनशैली, फिटनेस आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मॅरेथॉनचा मार्ग, सहभागींची नोंदणी, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन, स्वयंसेवकांची नियुक्ती तसेच कार्यक्रमाच्या प्रसिद्धी-प्रसाराचे नियोजन करण्यात आले. स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी शहरासह ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘धावूया आरोग्यासाठी, जोडूया समाजाला’ या भावनेतून होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. मॅरेथॉन केवळ स्पर्धा न राहता गडचिरोलीच्या सामाजिक एकतेचे आणि युवकांच्या उत्साहाचे शक्तिप्रदर्शन ठरावे, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या महा मॅरेथॉनला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळवून देण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असून, गडचिरोलीत ‘छात्रों की गूंज’चा आवाज घुमविण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुम अलाम, प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, शंकरराव सलोटकर, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माधव गावड, दिवाकर निसार, शिक्षक विभाग जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, उत्तम ठाकरे, विजय लाड, नदीम नाथानी, हरबाजी मोरे, राजेंद्र ब्राह्मणवाडे, ढीवरू मेश्राम, योगेंद्र झंजाड, रवी मेश्राम, कुणाल आभारे, देवेंद्र बांबोडे, विजय शेंडे, सुधीर बांबोळे, लक्ष्मण मेश्राम, संदीप भोयर, गजानन नैताम, रामचंद्र भांडेकर, दामोदर साखरे, अरुण मेश्राम, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, जावेद खान, कविता उराडे, शालिनी पेंदाम, रीता गोवर्धन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.

