
न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी:
येथे ८ जून रोजी ७ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, १० जून रोजी सायंकाळी शेकडो महिला एकवटत थेट पोलीस स्टेशनवर धडकल्या. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशी द्यावी, अशी एकमुखी मागणी महिलांनी केली.
घटनेबाबत संतप्त भावना व्यक्त करताना अनेक महिलांनी आरोपीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. काही महिला इतक्या संतापल्या होत्या की, “त्या विकृत आरोपीला काही मिनिटांसाठी आमच्या ताब्यात द्या, आम्हीच त्याला शिक्षा करू,” अशी भावना त्यांनी पोलीस प्रशासनासमोर व्यक्त केली. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, पोलीस स्टेशन परिसरात महिलांची गर्दी सतत वाढत गेल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलीस स्टेशनची जागा अपुरी पडावी इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या होत्या. “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”, “आरोपीला फाशी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत सांगितले की, पोलिसांनी तत्पर कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्यात येईल. न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार आरोपीला शिक्षा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेने संपूर्ण चामोर्शी तालुका हादरला असून, चिमुकलीला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी नागरिकांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. महिलांच्या अभूतपूर्व एकजुटीमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

