
७ जणांवर गुन्हे दाखल; ३,२०० लिटर मोहफुलाचा सडवा अन् ८० लिटर दारू नष्ट

पोलिसांची सकाळीच धडक कारवाई; ३ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जागेवरच उद्ध्वस्त!
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली

चामोर्शी,दि.२५ ऑक्टोबर : तालुक्यात अवैध मोह दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात चामोर्शी पोलिसांनी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. मौजा पांढरी भटाळ येथे रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते १०.३० वाजताच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकून अवैध मोह दारू निर्मिती करणाऱ्या सात जणांविरोधात कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३,२०० लिटर मोहफुलाचा सडवा आणि ८० लिटर मोहफुलाची दारू असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मोहफुलाचा सडवा तयार करून त्यापासून अवैधरीत्या मोहाची दारू निर्मिती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर चामोर्शी पोलिसांचे पथक तातडीने पांढरी भटाळ येथे दाखल झाले. सकाळीच राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक शाहू दंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक सातव, देशमुख यांच्यासह महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पथकाने घटनास्थळी कारवाई करत अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा मोहफुलाचा सडवा आणि तयार मोहफुलाची दारू नष्ट केली.
या कारवाईत एकूण सात जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांची मोहीम
अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पांढरी भटाळ येथील या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
— पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस स्टेशन चामोर्शी.

