
रेंगुंठा उपसिंचन योजनेत कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप; डॉ. अजय कंकडालवार यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

सिरोंचा: तालुक्यातील अतिदुर्गम रेंगुंठा येथे सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या उपसा सिंचन प्रकल्पात अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे.शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून,नदी घाटाची बेकायदेशीर रेती आणि मोरूमचा वापर करून अत्यंत निकृष्ट आणि बोगस बांधकाम केले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांनी केली आहे.
हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावावर सुरू असलेली उघड लूट असून,या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींना जेलमध्ये टाकावे,अशी आक्रमक मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

काँग्रेस नेते डॉ.कंकडालवार यांनी केलेल्या आरोपानुसार,मागील तीन ते चार वर्षांपासून रेंगुंठा येथे उपसा जल सिंचनाचे काम अत्यंत संथ गतीने आणि बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे.या कामासाठी लागणारी रेती आणि मोरूम अधिकृत डेपोतून न आणता,थेट नदीपात्रातून जेसीबी आणि पोकलेन मशीन लावून दिवसा-ढवळ्या लुटली जात आहे.
शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून,कोणतीही रॉयल्टी न भरता ही रेती उपसली जात आहे.नदीचे पात्र अक्षरशः खोदून काढल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला धोका निर्माण झाला असून,पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे.भविष्यात या भागात मोठा पूर किंवा पर्यावरणीय संकट येण्याची भीती डॉ.कंकडालवार यांनी व्यक्त केली आहे.
सर्वात गंभीर आणि संतापजनक बाब म्हणजे हा सर्व अवैध प्रकार महसूल विभाग आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्या समोर सुरू आहे.ट्रॅक्टर मध्ये रेती भरून जात असताना,जेसीबी नदीत घुसून काम करत असताना महसूल विभाग आणि वनविभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत?असा संतप्त सवाल काँग्रेस नेते अजय कंकडालवार आणि येथील ग्रामास्थांनी सुद्धा केली आहे.
यावरून असे दिसून येते कि,या अवैध उतखननाला प्रशासनाचाच छुपा आशीर्वाद आहे काय? टक्केवारी घेऊन अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे का?असा थेट आरोप कंकडालवार यांनी केला आहे.संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांची संगनमताची निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही.
या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ चौकशी समिती नेमून,त्या ठिकाणच्या संपूर्ण बांधकामाची गुणवत्ता तपासणी,रेती वापराची रॉयल्टी पावती आणि पर्यावरण परवानग्यांची सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी सुद्धा कंकडालवार यांनी केली आहे.
जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही शांत बसणार नाही.सिरोंचा तहसीलदार कार्यालयासमोर हजारो ग्रामस्थांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,असा कडक आणि थेट इशारा डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला आहे.

