
वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी कालमर्यादा निश्चित
अमरावती – जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती वेळेत मिळावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. संजीता मोहापात्रा यांनी नवा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, प्रतिपूर्ती प्रक्रियेसाठी प्रत्येक टप्प्याला ठरावीक १० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी सादर केलेले देयक प्रथम कार्यालयात तपासले जाईल. आवश्यक कागदपत्रे असल्यास ते खातेप्रमुखांकडे पाठवणे बंधनकारक असून, खातेप्रमुखांनी ती प्रकरणे १० दिवसांत आरोग्य विभागाकडे पाठवावीत. आरोग्य व वित्त विभागाने तपासणी करून ती पुन्हा १० दिवसांत परत पाठवावी लागेल. अंतिम मंजुरीनंतर १० दिवसांत कर्मचाऱ्यांना रक्कम मिळावी, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे.या प्रक्रियेसाठी ऑनलाईन नस्ती अनिवार्य करण्यात आली असून, अपूर्ण प्रकरणांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल. या आदेशामुळे वैद्यकीय प्रतिपूर्तीवरील अनावश्यक विलंब टळणार असून, कर्मचाऱ्यांचे मनोबल व कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

