
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
जुगाराविरोधात पोलिसांची मोहीम तीव्र; ताशाच्या जुगारावर १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त — पारंपरिक कोंबडा बाजाराच्या नावाखाली सुरू असलेल्या पैशांच्या खेळावरही कारवाईची मागणी
कोरची : प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय व जुगारावर अंकुश आणण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू असताना कोरची तालुक्यातील कोंबडा बाजारांकडेही आता लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नांगपूर परिसरातील जंगलात जुगार अड्ड्यावर करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईनंतर बेडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले यांच्या पथकाने गहाणेगाठा जंगल परिसरात ताशाच्या जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत ३१ जणांना ताब्यात घेत १ कोटी ३४ लाख १४ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नांगपूर येथील यापूर्वीच्या कारवाईतही १.५० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३४ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. #newsjagar
गहाणेगाठा जंगलात ताशाच्या जुगारावर धाड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबरच्या रात्री बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील आंतरराज्य सीमेलगत असलेल्या गहाणेगाठा जंगल परिसरात काही जण ताशाच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले व त्यांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी ५२ ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून गेले. मात्र, पोलिसांनी कारवाई करत एकूण ३१ जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाईत ७५ हजार १० रुपये रोख, २२ चारचाकी वाहने, सहा दुचाकी, २६ मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण १ कोटी ३४ लाख १४ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१३३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत ३७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नांगपूरमध्येही दीड कोटींच्या मुद्देमालाची कारवाई
यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी कोटगुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगपूर जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. त्या कारवाईत ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २३ चारचाकी व पाच दुचाकींसह सुमारे १.५० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
सलग मोठ्या कारवायांमुळे कोरची तालुक्यात जुगाराचे जाळे किती विस्तारले आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पारंपरिक कोंबडा बाजाराला जुगाराचे स्वरूप?
दरम्यान, कोरची तालुक्यातील विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या पारंपरिक कोंबडा बाजाराबाबतही गंभीर आरोप होत आहेत. पूर्वी आदिवासी समाजात कोंबडा झुंज हा पारंपरिक मनोरंजनाचा भाग होता. घरचा पोसलेला कोंबडा बाजारात आणायचा, झुंज लावायची आणि जिंकलेल्या कोंबड्याचा आनंद साजरा करायचा, अशी या परंपरेची पद्धत होती.
मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत या परंपरेचे स्वरूप बदलल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मोठ्या रकमेच्या पैजा लावल्या जात असून एका झुंजीवर लाखो रुपयांचा डाव लागत असल्याचे सांगितले जाते. पूर्वी कोंबड्याला हत्यार बांधणाऱ्या कातकराला काही रुपये देऊन झुंज खेळवली जात होती; आता मात्र झुंजीभोवती पैशांचा मोठा व्यवहार होत असल्याचा आरोप आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती चिंतेचा विषय
या प्रकारातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे विद्यार्थीही कोंबडा बाजाराकडे आकर्षित होत असल्याचा दावा आहे. पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत काही जण या बाजारांमध्ये जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांना दांडी मारून कोंबडा बाजारात जात असल्याचेही सांगितले जाते.
लहान वयातच पैशांवर खेळण्याची सवय लागण्याची शक्यता असल्याने या प्रकाराकडे केवळ पारंपरिक कोंबडा झुंज म्हणून न पाहता त्यामागे पैशांचा जुगार सुरू आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
आठवड्यात पाच दिवस बाजार भरत असल्याचा दावा
खुणारा, भुरयालदंड, बेलारगोंदी, बिजेपार आणि हितापाळी आदी ठिकाणी आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी कोंबडा बाजार भरत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. प्रत्येक बाजारात दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा जुगार खेळला जात असल्याचेही सांगितले जाते. मात्र, या रकमेची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
‘ताशाच्या जुगारावर कारवाई, मग कोंबडा बाजारांचे काय?’
नांगपूर आणि गहाणेगाठा येथील मोठ्या कारवायांनंतर आता कोंबडा बाजारांमध्ये पैशांच्या बाज्या लावल्या जात असल्याच्या तक्रारींचीही पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
पारंपरिक कोंबडा झुंज आणि बेकायदेशीर पैशांचा जुगार यामध्ये स्पष्ट फरक आहे. त्यामुळे कोंबडा बाजारांच्या नावाखाली प्रत्यक्षात मोठ्या रकमेचा जुगार चालतो आहे का, विद्यार्थी त्यात सहभागी होत आहेत का आणि या बाजारांचे आयोजन कोण करीत आहे, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. #NewsJagar
जुगाराविरोधात जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता या बाजारांकडे पोलिसांचे लक्ष जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

