
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी शिक्षकच उपस्थित न राहिल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागली. बराच वेळ प्रतीक्षा करूनही शिक्षक शाळेत न आल्याने अखेर संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून घरी नेले. या प्रकारामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत शिक्षण विभागाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून ७० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, उपलब्ध शिक्षकांच्या कमतरतेमुळे नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
कसनसूर शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीचा प्रश्न नवीन नसून, यापूर्वीही शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. शिक्षकांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी मागणी वारंवार करण्यात आली. गत ऑगस्ट महिन्यात शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या सातही वर्गांसाठी केवळ तीन कंत्राटी शिक्षक कार्यरत असल्याची माहिती असून, नियमित शिक्षक प्रकाश मडावी हेही नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सोमवारी सकाळी विद्यार्थी नियोजित वेळेत शाळेत दाखल झाले; मात्र एकही शिक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत बसले. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मंगळवारी एका शिक्षकाची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष गोटा यांनी दिली. मात्र, त्या दिवशी शाळेत एकही शिक्षक न आल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला. “शाळेत शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांना शाळेत का पाठवायचे?” असा सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गोटा, उपाध्यक्ष माधुरी बोलमपल्लीवार, माजी सभापती बाबिता मडावी, माजी सरपंच सुनील मडावी, रवी पुंगाटी, किशोर डे, प्रशांत उसेंडी, ददु मडावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, संबंधित कंत्राटी शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्याने दोन दिवसांच्या रजेची मागणी केली होती. त्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी शिक्षक म्हणून एका शिक्षकाला कसनसूर शाळेत पाठविण्याची तयारी शिक्षण विभागाने दर्शविली होती; मात्र ग्रामस्थांनी त्यास विरोध केल्याचे संवर्ग विकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम यांनी सांगितले. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधित शाळेत लवकरच शिक्षकांची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिली. एटापल्ली तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता कसनसूर शाळेतील शिक्षकांची कमतरता आणि उपस्थितीचा प्रश्न प्रशासन प्रत्यक्षात कितपत गांभीर्याने सोडवते, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

