
गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या TET/CTET व TAIT पात्र शिक्षकांना पवित्र पोर्टलच्या Conversion Round मधून कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना कंत्राटी शिक्षकांच्या वतीने देण्यात आले.

गडचिरोलीसह राज्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेले अनेक शिक्षक सध्या कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत. संबंधित शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान देत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रता, TET/CTET व TAIT पात्रता तसेच प्रत्यक्ष अध्यापन अनुभवाचा विचार करून पवित्र पोर्टलच्या Conversion Round द्वारे त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीची संधी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी कंत्राटी शिक्षक रंजित उंदीरवाडे, तिलेश मोहुर्ले, तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोलीचे जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, प्रणय वालको आदी उपस्थित होते.
डॉ. देवराव होळी यांनी शिक्षकांच्या मागणीची माहिती जाणून घेतली असून, पात्र शिक्षकांच्या प्रश्नाबाबत शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याची भूमिका व्यक्त केली. पात्र शिक्षकांना त्यांच्या सेवेला न्याय मिळावा आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा योग्य विचार व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

