
चेतन कामडे, विशेष प्रतिनिधी
✍️ सावली तालुक्यात वाघाचा हल्ला; म्हशी चारायला गेलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, सामदा (बुज) गावात शोककळा…
सामदा (बुज) / सावली :

सावली तालुक्यातील सामदा बुज येथे आज सायंकाळी अंगावर काटा आणणारी हृदयद्रावक घटना घडली. गावातील शेतकरी हेमंत अशोक भुरसे Hemat Ashok Bhurse हे नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी जंगलात गेले असता वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात हेमंत भुरसे यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत हे दुपारच्या सुमारास जनावरे घेऊन जवळच्या जंगलात गेले होते. सायंकाळ झाली तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी जंगलात शोधमोहीम राबवली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
या घटनेनंतर सामदा बुज आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघाचा वावर वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून गावात दहशत वातावरण निर्माण झाले असून वनविभागाविरोधात रोष व्यक्त होत आहे.
“रोज पोटासाठी जंगलात जावं लागतं, पण जीव मुठीत धरून जावं लागतंय. आज हेमंत गेला, उद्या आमचा नंबर लागणार का?” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच हल्ला करणाऱ्या वाघाला तात्काळ जेरबंद करून स्थलांतरित करण्यात यावे. व मृतक हेमंत भुरसे यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशीहि मागणी गावकर्यांनी प्रशासनाला केली आहे. गावाच्या सीमेवर वनविभागाची कायमस्वरूपी गस्त वाढवावी आणि ट्रॅप कॅमेरे लावावेत.
दरम्यान, घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि सावली पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. सावली तालुका पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षामुळे चर्चेत आला असून वनविभाग आता तरी ठोस पावले उचलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे
मृतक हेमंत अशोक भुरसे

