
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
सल्हे जि.प. प्राथमिक शाळेतील प्रकार; शिक्षक वेळेपूर्वीच निघून गेल्याचा आरोप
शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; हजेरी व शाळा बंद करण्याच्या वेळेची चौकशी करण्याची मागणी

कोरची दि. २१ : विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पूर्ण वेळ शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार सल्हे येथे समोर आला आहे. शाळेची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असताना सोमवारी दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.२७ वाजताच शाळेच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावलेले आढळून आले. यामुळे शिक्षक वेळेपूर्वीच शाळेतून निघून गेल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. #newsjagar
सल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साल्हे नं. २ या शाळेच्या प्रवेशद्वाराला ४.२७ वाजता कुलूप असल्याचे छायाचित्रातून दिसून येत आहे. छायाचित्रात जीपीएस मॅप कॅमेराद्वारे सल्हे येथील ठिकाण व २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.२७ वाजताची वेळ नोंदविलेली आहे.
शाळेची निर्धारित वेळ संपण्यापूर्वीच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि प्रत्यक्ष शाळा बंद करण्याची वेळ यामध्ये तफावत आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे.
हजेरी नोंदवही तपासा
या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शिक्षकांची हजेरी नोंदवही, उपस्थिती रजिस्टर, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शाळा बंद करण्याची प्रत्यक्ष वेळ तपासावी. तसेच संबंधित दिवशी शिक्षक शाळेतून नेमके किती वाजता निघाले, याची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही ग्रामीण शिक्षणाचा प्रश्न कायम?
अलीकडेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला होता. त्याच काळात विविध सामाजिक व राजकीय व्यक्तींनीही जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेतील समस्यांकडे लक्ष वेधले आहे. मात्र, त्यानंतरही सल्हेसारख्या ग्रामीण भागातील शाळेच्या वेळेबाबत असा प्रकार समोर येत असेल, तर शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
“शाळेची वेळ ५ वाजेपर्यंत असताना ४.२७ वाजताच शाळेला कुलूप का?” हा सवाल आता पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, शिक्षण विभाग या प्रकरणाची काय दखल घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

