
गॅस सिलेंडरसाठी सामान्य ग्राहकांची प्रतीक्षा, मग काहींना फोनवरच तत्काळ डिलिव्हरी कशी?

मूलमधील संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; ग्राहकांच्या न्याय्य हक्कांसाठी इंटक फेडरेशन मैदानात.
न्यूज जागर | जिल्हा प्रतिनिधी.

मूल : घरात स्वयंपाकाचा गॅस संपला की सर्वसामान्य कुटुंबाची धावपळ सुरू होते. नियमानुसार बुकिंग करूनही आठ ते दहा दिवस सिलेंडरची वाट पाहावी लागत असेल, तर सामान्य ग्राहकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची? आणि काही ठराविक व्यक्तींना केवळ एका फोनवर तातडीने सिलेंडर मिळत असल्याच्या तक्रारी असतील, तर वितरण व्यवस्थेतील समानतेचा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. असाच प्रकार मूल शहरातील संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या संदर्भात समोर आल्याने इंटक फेडरेशनने आता या प्रकरणात लक्ष घातले आहे.
गॅस बुकिंग केल्यानंतरही वेळेत घरपोच सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यातच ग्राहकांचे बुकिंग झाल्यानंतर ४ ते ६ दिवसात सिलेंडर न सोडविल्यास केलेली बुकिंग आपोआप रद्द होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी एजन्सीत जाऊन चौकशी केल्यावर पुन्हा बुकिंग करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या ग्राहकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
🟧बुकिंग ग्राहकांचे, प्रतीक्षा ग्राहकांची; मग जबाबदारी कोणाची?
शहरातील काही भागांत नियमित गॅस वितरण होत असल्याचे दिसत असताना इतर भागांतील ग्राहकांना मात्र अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप आहे.एजेंसी मध्ये विचारणा केली असता दुसऱ्या दिवशी सिलेंडर घरपोच देण्याचे आश्वासन मिळते; मात्र दुसऱ्याला दिवशीही घरपोच डिलिव्हरी होत नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.
सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे काही प्रतिष्ठित व्यक्तींना फोनद्वारे मागणी केल्यानंतर तातडीने सिलेंडर मिळत असल्याचा सामान्य ग्राहकांचा आरोप आहे . जर वितरण व्यवस्था सुरळीत असेल, तर सामान्य ग्राहकांना आठ ते दहा दिवस प्रतीक्षा का करावी लागत आहे ? ग्राहकांमध्ये असा भेदभाव का केला जात आहे ? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने शोधण्याची गरज आहे.
🟧ग्राहकांच्या प्रश्नांसाठी इंटक फेडरेशनचा पुढाकार..
या प्रकरणाची दखल घेत इंटक फेडरेशनच्या वतीने मूलच्या तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले. संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष चौकशी करावी, बुकिंग रद्द होण्याची कारणे तपासावीत, शहरातील सर्व प्रभागांत समान घरपोच सेवा द्यावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच गॅस वितरण वाहनांच्या फेऱ्यांची तपासणी, निश्चित डिलिव्हरी कालमर्यादा आणि ग्राहकांच्या तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली.
🟧प्रशासनाच्या चौकशीतून सत्य समोर येणार का?
गॅस सिलेंडर ही प्रत्येक घराची मूलभूत गरज आहे. ग्राहकांनी पैसे देऊन सेवा घेतल्यानंतर त्यांना वेळेत आणि समान पद्धतीने सेवा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या तक्रारींकडे केवळ ग्राहकांच्या किरकोळ अडचणी म्हणून न पाहता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी भूमिका इंटक फेडरेशनने मांडली आहे. अन्यथा ग्राहकांच्या हक्कांसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी इंटक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे, जिल्हा सचिव प्रफुल वज्जलवार, शेरकी बाबूजी, विनोद कडस्कर यांच्यासह इंटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
चंद्रपूर जिल्ह्यातील अश्याच नवनवीन बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा..
श्री. चेतन म. कामडे.
न्यूज जागर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी..
मो. क्र. 9307553014..
🕉️दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🧨🎇
🕉️शुभ दीपावली 🎆🎇
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
🔊न्यूज जागर -आवाज सत्याचा 🔊
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

