
“शांतता-सुव्यवस्था राखा, ध्वनिप्रदूषण टाळा; नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई” -तहसीलदार प्रशांत घोरूडे
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी), दि. २१ सप्टेंबर : आगामी गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी चामोर्शी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषण होणार नाही, कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद अथवा भांडणे होणार नाहीत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची प्रत्येक गणेश मंडळाने जबाबदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार प्रशांत घोरूडे व पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दि. २१ सप्टेंबर रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील व शांतता समिती सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत घोरूडे होते.
यावेळी पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगरपंचायत अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांना विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याचे तसेच ध्वनीची मर्यादा पाळण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास संबंधित गणेश मंडळावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
ध्वनीच्या मर्यादेचे प्रात्यक्षिक
बैठकीदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांची माहिती देत आवाजाची मर्यादा किती असावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.
त्यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ध्वनीविषयक नियमांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.
पोलीस ठाण्यात गणरायाची स्थापना; महाप्रसादाचा लाभ
दरम्यान, चामोर्शी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात गणरायाची स्थापना करण्यात आली असून यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गणेश विसर्जनाचा उत्सव आनंदात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

