
निवेदन देताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांची प्रमुख उपस्थिती
प्रमाणित जात-कोडिंग, स्वतंत्र O.B.C. प्रवर्ग व वैज्ञानिक जात वर्गीकरणाची मागणी
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली,दि.२१ सप्टेंबर:
आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय अचूक व प्रमाणित माहिती संकलित करण्यात यावी, प्रत्येक जातीला प्रमाणित जात-कोड देण्यात यावा, तसेच O.B.C. समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग आणि वैज्ञानिक पद्धतीने प्रमाणित जात वर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे निवेदन देण्यात आले.
कॉग्रेस माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि जिल्हाध्यक्ष O.B.C. काँग्रेस कमिटी मनोज ढोरे यांच्या पुढाकाराने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जातनिहाय जनगणना ही विविध सामाजिक घटकांची लोकसंख्या, सामाजिक-शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जनगणनेमध्ये प्रत्येक जातीची माहिती शास्त्रीय, पारदर्शक आणि एकसमान पद्धतीने नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक जातीला स्वतंत्र व प्रमाणित कोड देण्यात यावा, O.B.C. समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग निश्चित करण्यात यावा आणि जात वर्गीकरणासाठी वैज्ञानिक निकषांचा अवलंब करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
उपलब्ध होणारी अचूक आकडेवारी भविष्यातील सामाजिक न्याय, आरक्षण, शैक्षणिक सुविधा, रोजगाराच्या संधी तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे आगामी जनगणना प्रक्रिया अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“अचूक आकडेवारीशिवाय प्रभावी सामाजिक धोरण शक्य नाही” या भूमिकेतून या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करून आगामी जनगणनेत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, राष्ट्रीय समन्वयक आदिवासी काँग्रेस कुसुमताई आलाम, जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग काँग्रेस कमिटी माधव गावड, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, गजानन नैताम, कुणाल पेंडुरकर, कविता मोहरकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांच्यासह हरबाजी मोरे, लालाजी सातपुते, विजय लाड, स्वप्नील बेहरे, वंदना बरसागडे, रवींद्र चलाख, निकेश कामिडवार, आशिष घेर, लंकेश जेंगठे, विजय राऊत, पुरुषोत्तम भाऊ, विलास चिचघरे, सुशील शहा, भूषण भैसारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

