
गडचिरोलीच्या रेल्वे विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; प्रवाशांच्या आशा उंचावल्या
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२१ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित रेल्वे विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळताना दिसत आहे. वडसा–आरमोरी या सुमारे ५२ किलोमीटर रेल्वेमार्गावर पॅसेंजर रेल्वेगाडीची पहिल्यांदाच चाचणी घेण्यात आली. त्यामुळे या मार्गावर नियमित प्रवासी रेल्वे सेवा सुरू होण्याच्या अपेक्षांना मोठी चालना मिळाली आहे.

वडसा–आरमोरी रेल्वे मार्ग हा जिल्ह्यातील वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर पॅसेंजर रेल्वेची चाचणी धाव झाल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या रेल्वे नकाशावर आणखी एक महत्त्वाची कडी जोडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या रेल्वेसेवेमुळे आरमोरी, वडसा तसेच परिसरातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, व्यवसाय, आरोग्यसेवा आणि इतर कामांसाठी प्रवास करणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी रेल्वे वाहतूक उपलब्ध झाल्यास वेळ आणि प्रवासाचा खर्चही कमी होण्यास मदत होऊ शकते.
चाचणी धावीकडे जिल्हावासीयांचे लक्ष
पॅसेंजर रेल्वेची ही चाचणी धाव म्हणजे नियमित रेल्वेसेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे वडसा–आरमोरी मार्गावर नियमित प्रवासी रेल्वे सेवा नेमकी कधी सुरू होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेचे जाळे विस्तारण्याच्या दृष्टीने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, वडसा–आरमोरी रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
“रेल्वे आली, विकासाची नवी वाट खुली झाली!” अशी भावना या चाचणी धावीनंतर नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

