
एटापल्ली : कसनसूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मुसरामगुडा गावातील मुख्य गिट्टी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या मार्गाची तातडीने विशेष दुरुस्ती करून नवीन डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ता करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२१ सप्टेंबर २०२६ रोजी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, ग्रामसभा मुसरामगुडा यांच्या वतीने एटापल्ली सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना हे निवेदन देण्यात आले. गावातील नागरिकांच्या दळणवळणासाठी तसेच तालुक्याशी संपर्क साधण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने त्याची दुरवस्था दूर करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुसरामगुडा गावातील मुख्य गिट्टी रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची गिट्टी निघून गेल्याने मोठमोठे खड्डे आणि खडबडीत भाग निर्माण झाले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांना घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः महिला, वृद्ध नागरिक तसेच शाळकरी मुलांना या रस्त्यावरून पायी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मुसरामगुडा हा कसनसूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गाव असून, दैनंदिन गरजा, शासकीय कामे, शिक्षण, आरोग्य आणि बाजारपेठेसाठी नागरिकांना या मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांच्या दळणवळणावर त्याचा थेट परिणाम होत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. केवळ खडी टाकून तात्पुरती डागडुजी न करता नवीन डांबरीकरण किंवा सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंजूर करून दर्जेदार काम करण्यात यावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनामुळे मुसरामगुडा येथील रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून कोणती कार्यवाही करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

