
राजमहालात सदिच्छा भेट; माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा.
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष OSD अनिरुद्ध पालकर यांनी अहेरी येथील राजमहालाला सदिच्छा भेट देत राजमहालासमोर विराजमान असलेल्या *अहेरीच्या राजा* चे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची पूजा-अर्चा करून जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

राजमहालासमोर उभारण्यात आलेल्या भव्य गणेशोत्सवातील सुंदर गणेशमूर्ती तसेच आकर्षक देखाव्याची पाहणी करताना अनिरुद्ध पालकर यांनी देखाव्याचे आणि गणेशमूर्तीच्या कलाकुसरीचे कौतुक केले. यावेळी गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात त्यांनी काही वेळ उपस्थित भाविकांशीही संवाद साधला.
या भेटीदरम्यान पालकर यांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये आस्थेने संवाद झाला. गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित विविध विषयांवर तसेच अहेरी परिसरातील परिस्थिती आणि विकासाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर बराच वेळ सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे अनिरुद्ध पालकर यांची अहेरी येथील राजमहालाला झालेली ही भेट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष ठरली. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दरम्यान, राजमहालासमोर विराजमान *अहेरीचा राजा* च्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे संपूर्ण राजमहाल परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

