
चामोर्शी गणेशोत्सव वृत्तलेख
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी शहरातील विविध वार्डांमध्ये गणेश मंडळांकडून श्री गणेशमूर्तींची भक्तिमय वातावरणात उत्साहात स्थापना करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

शहरातील विविध गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि देखावे उभारून गणरायाचे स्वागत केले आहे. पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवामुळे चामोर्शी शहरातील विविध वार्डांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सायंकाळच्या वेळी गणेश दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण उत्साहाने गणरायाच्या दर्शनासाठी विविध मंडळांना भेट देत आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारे देखावे, आकर्षक विद्युत सजावट तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यावर अनेक मंडळांनी भर दिला आहे. त्यामुळे चामोर्शी शहरातील गणेशोत्सवाला भक्तीबरोबरच सामाजिक एकोप्याची आणि सांस्कृतिक परंपरेची किनार लाभली आहे.
चामोर्शी शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये सध्या ‘गणेश दर्शन’चा उत्साह शिगेला पोहोचला असून, संपूर्ण शहर बाप्पामय झाले आहे.

