
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन; जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंथनाला सुरुवात
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ या संकल्पनेला दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचे १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते थाटात पार पडले.

गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि गतिमान विकास साधण्यासाठी पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा कसा असावा, याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, महिला प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील विविध घटकांच्या सहभागातून या कार्यशाळेत व्यापक मंथन करण्यात येत आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, sc / st विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोळकर, महिला प्रदेश सचिव ॲड. कविता माहोरकर, आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे यांच्यासह कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. देवराव होळी, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माधव गावळ, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, प्रमोद पिपरे, माजी नगरसेवक प्रकाश ताकसांडे, माजी नगरसेवक चंद्रशेखर भडांगे, भाग्यवान खोब्रागडे, गुरुदेव भोपये यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला.
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, कृषी, सिंचन, पर्यटन, वनसंपदा, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर या विविध विषयांवर कार्यशाळेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
गडचिरोलीला केवळ आकांक्षित जिल्हा न ठेवता २०४७ पर्यंत विकसित, सक्षम, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक जिल्हा बनविण्याचा संकल्प या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनासोबतच नागरिक, सामाजिक संस्था, तज्ज्ञ, युवक, महिला आणि सर्व राजकीय व सामाजिक घटकांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली’ या संकल्पनेतून तयार होणारा व्हिजन २०४७ हा जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

