
‘त्यागमूर्ती सोनिया गांधी’ विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश ढूमणे यांच्यावर फौजदारी कारवाई करा -दिलीप नैताम यांची मागणी!
⚫कुठल्याही आदेशला “ते” मानत नाही!
⚫शाळेत राहतात ते महोदय गैरहजर?

⚫ प्रतिनिधी!चेतन कामडे ⚫
गडचिरोली. न्यूज
उच्च न्यायालय नागपूर, शाळा न्यायालय प्राधिकरण चंद्रपूर आणि शिक्षण विभागाच्या स्पष्ट आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत शिक्षकाला सेवेत रुजू न करून घेणाऱ्या सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ चामोर्शी संचलित ‘त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, मोहोर्ली’चे मुख्याध्यापक राजेश दादाजी ढूमणे यांच्यावर कडक कायदेशीर व फौजदारी कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप नैताम यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
एका शिक्षकाला तात्काळ सेवेत रुजू करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही आणि आदेश न पाळल्यास वेतन रोखण्याचा इशारा दिला असतानाही मुख्याध्यापकांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. याशिवाय सन २०२१-२०२२ मध्ये रमेश लच्चमा सेडमेक यांची नियुक्ती करताना बनावट ठराव, बनावट प्रस्ताव, अपूर्ण माहिती व बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आली. या गैरप्रकाराच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून नियमित वेतन उचलले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
मुख्याध्यापक ढूमणे हे दिनांक २१ जुलै २०२६ ते ६ ऑगस्ट २०२६ या काळात सतत शाळेत गैरहजर राहून, एकाच दिवशी हजेरी पटावर स्वाक्षऱ्या करून वेतन लाटत आहेत. या दीर्घ गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असून शाळेचा कारभार नेमका कोणाच्या हाती आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या आणि आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या अशा मुख्याध्यापकांवर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिलीप नैताम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
दरम्यान इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी या बाबतीत वारंवार आपल्या संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठांकडे पाठपुरावा करून शासनाचे लक्ष वेधले आहे.एवढे असूनही या मुजोर मुख्याध्यापकावर प्रशासनाच्या वतीने कारवाई होत नाही हाच एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.येत्या पंधरा दिवसांत या हेकेखोर मुख्याध्यापकावर प्रशासनाच्या वतीने कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असे दत्तात्रय समर्थ यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
📝Chetan Kamde News Jagar..

