
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली (चामोर्शी) : ओबीसी समाजाची लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती आणि शासकीय योजनांमधील प्रत्यक्ष सहभाग याची अचूक माहिती उपलब्ध होण्यासाठी ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात यावा, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे चामोर्शी शहराध्यक्ष विलास चिचघरे यांनी केली आहे.
ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही अधिकृत आकडेवारीअभावी आरक्षण, शैक्षणिक सुविधा, रोजगार तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याचे चिचघरे यांनी म्हटले आहे. जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या समोर येणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ठोस धोरणे आखावीत. त्यासाठी अधिकृत व अद्ययावत आकडेवारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना/कॉलम ठेवून जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि विकासाचा योग्य आढावा घेण्यासाठी जातनिहाय जनगणना हा महत्त्वाचा आधार आहे. सरकारने ओबीसी समाजाची मागणी गांभीर्याने घेऊन जनगणनेत स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा,” अशी भूमिका विलास चिचघरे यांनी मांडली.

