
अहेरी : अहेरी शहराला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा, तसेच अहेरी नगरपंचायत क्षेत्रासोबत लगतच्या वांगेपल्ली व चिंचगुडी ग्रामपंचायत क्षेत्राचे एकत्रीकरण करून नवीन “अहेरी नगर परिषद” स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाचे गडचिरोली जिल्ह्याचे विशेष OSD मा. अनिरुद्ध पालकर साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले.
अहेरी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून आज ३० हजाराचा घरात आहे, शहराचा विस्तार, नवीन लेआऊट व वाढती नागरी वस्ती लक्षात घेता भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थेची आवश्यकता आहे. सध्या अस्तित्वात असलेली नगरपंचायत व्यवस्था वाढत्या नागरी गरजांच्या तुलनेत अपुरी पडत असल्याने अनेक नागरी सुविधा व विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अहेरीचा वाढता शहरी विस्तार तसेच भविष्यातील जिल्हाचा दर्जा मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन अहेरी नगरपंचायत, वांगेपल्ली व चिंचगुडी ग्रामपंचायत या क्षेत्रांचे एकत्रीकरण करून नवीन *“अहेरी नगर परिषद”* स्थापन करावे, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीवर विशेष OSD मा. अनिरुद्ध पालकर साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर विषय तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे तसेच शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

