
गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीला नवी गती!
नितेश गट्टीवार |गडचिरोली | दि. १६ ऑगस्ट :
एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीची प्रतिमा आता झपाट्याने बदलत आहे. नैसर्गिक व खनिज संपत्ती, सुधारत असलेली दळणवळण व्यवस्था, वाढता औद्योगिक विकास, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून गडचिरोली महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ‘विकसित गडचिरोली जिल्हा–व्हिजन २०४७’च्या माध्यमातून या विकासाला नियोजनबद्ध दिशा देत गडचिरोलीच्या प्रगतीतून संपूर्ण विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

गडचिरोली येथे आयोजित ‘विकसित गडचिरोली जिल्हा–व्हिजन २०४७’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. देवराव होळी, प्रशांत वाघदरे, बाबुराव कोहळे, योगिता पिपरे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, अनंत गुंडळकर, रेखा दोडके, मधुकर भांडेकर, रमेश भुरसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
गडचिरोलीकडे पाहण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलला
डॉ. भोयर म्हणाले, “१९८२ मध्ये स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीसमोर अनेक आव्हाने होती. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्याचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पूर्वी गडचिरोलीत येण्यास अनास्था होती; आज उद्योग उभारण्यासाठी येथे जागा मिळावी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे. हा बदलत्या गडचिरोलीचा सर्वात मोठा पुरावा आहे.”
‘व्हिजन २०४७’ तयार करताना जिल्ह्याची बलस्थाने, कमकुवत बाजू, उपलब्ध संधी आणि भविष्यातील आव्हाने यांचे सर्वंकष SWOT विश्लेषण होणे गरजेचे आहे. गडचिरोलीचे जंगल, आदिवासी संस्कृती, खनिज संपत्ती, शेती, जलसंपदा आणि कष्टाळू तरुणाई ही जिल्ह्याची खरी ताकद असून तिचा योग्य वापर करून विकासाचा लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दळणवळणाची कनेक्टिव्हिटी ठरणार विकासाची नवी ताकद
गडचिरोलीच्या दळणवळण सुविधांमध्ये मोठी सुधारणा होत असून समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी नागपूर-भंडारा मार्गे पुढे गडचिरोलीपर्यंत जोडण्याच्या दिशेने काम सुरू आहे. सक्षम रस्ते आणि दळणवळण व्यवस्था निर्माण झाल्यास शेतीमाल तसेच औद्योगिक उत्पादन मोठ्या बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत होईल, असे डॉ. भोयर यांनी सांगितले.
गडचिरोली ‘स्टील हब’च्या दिशेने
गडचिरोलीला देशातील महत्त्वाचे ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी २०३० पर्यंत ५० दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचे उद्दिष्ट खनिकर्म विभागाने ठेवले असल्याचे नमूद केले.
सुरजागड येथील लोहखनिज खाण देशातील एकाच ठिकाणी असलेल्या मोठ्या लोहखनिज खाणींपैकी एक असून खनिकर्म आणि औद्योगिक विकासाचा सर्वाधिक लाभ स्थानिक नागरिक व तरुणांना मिळावा, यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. लॉयड्स समूह आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठातील करारामुळे गडचिरोलीतील मायनिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आधुनिक खनिकर्म पद्धतींचे ज्ञान मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराला नवी दिशा
गडचिरोलीतील शासकीय शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना नव्या संधींसाठी सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.
क्रीडा, व्यवसाय, कला, सामाजिक क्षेत्र यांसह विविध क्षेत्रांत देश जागतिक पातळीवर पुढे जात आहे. या प्रगतीच्या प्रवाहात गडचिरोलीतील तरुणांनीही मोठ्या आत्मविश्वासाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
नक्षलवादाच्या आव्हानावर निर्णायक नियंत्रण
गृह विभागाच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून नक्षलवादाच्या आव्हानावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले आहे. आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात आलेल्या तरुण-तरुणींच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. एकेकाळी हिंसक मार्गावर गेलेल्या तरुणी आज सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होत असल्याचे उदाहरण देत डॉ. भोयर यांनी गडचिरोलीतील बदलत्या वातावरणावर प्रकाश टाकला.
गडचिरोलीच्या विविध प्रश्नांना विधानसभेत सातत्याने वाचा फोडून जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी खासदार अशोक नेते यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात आणण्यासाठी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
२६ ऑगस्टला ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे सादरीकरण
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘आकांक्षी जिल्हा ते विकसित जिल्हा–गडचिरोली व्हिजन २०४७’ या उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. लोकप्रतिनिधी, प्रशासन, विविध संस्था, तज्ज्ञ आणि नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसीय कार्यशाळेत होणाऱ्या विचारमंथनातून तयार होणाऱ्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे २६ ऑगस्ट रोजी जिल्हा स्थापना दिनी सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक व आदिवासी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांकडून १५ दिवस सूचना व अभिप्राय मागविण्यात येणार आहेत.
‘गडचिरोली’चा विकास म्हणजे विदर्भाच्या विकासाची नवी पहाट
केंद्र आणि राज्य शासन गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शासनाचे पाठबळ आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग यांची सांगड घातल्यास गडचिरोलीचा विकास अधिक वेगाने होईल. गडचिरोली आज केवळ बदलत नाही, तर भविष्यातील विकसित विदर्भाची नवी दिशा ठरविण्याची क्षमता निर्माण करीत आहे, असा विश्वास व्यक्त करीत डॉ. भोयर यांनी ‘व्हिजन २०४७’ उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
उपक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल डॉ. देवराव होळी व आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले.

