
अमित कत्तीवार विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली*
एटापल्ली : वन परिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष निरोप समारंभ तसेच नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
वन परिक्षेत्र अधिकारी, (RFO) श्रीमती नीलिमा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. रामटेके (ACF), आलापल्ली, मा. रामगुंडेवार (RFO), आलापल्ली तसेच लॉयड्स मेटल्स कंपनीचे श्री. सुतार, श्री. भत्रा, श्री. आचारी आणि JSW कंपनीचे श्री. विजेश विश्वनाथ उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

वन परिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावून निवृत्त झालेल्या दिवाकर मारगोनवार – वनमजूर, नाजुक निकोडे – वनमजूर, सुनंदाबाई मच्चावार – वनमजूर आणि मोटघरे – वनपाल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी वनसंवर्धन, वनक्षेत्राचे संरक्षण तसेच विभागाच्या विविध कामांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवेला उजाळा देत पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. दीर्घकाळ विभागासाठी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अशा पद्धतीने सन्मान करणे ही भावनिक तसेच प्रेरणादायी बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
एटापल्ली परिसर हा वनबहुल व दुर्गम भाग असल्याने वन कर्मचाऱ्यांना वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, वनक्षेत्राचे रक्षण तसेच विविध शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपूर्वक निरोप देणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याच कार्यक्रमात वन परिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेत नव्या कर्मचाऱ्यांनी वनसंवर्धन व वन संरक्षणाच्या कामात सक्रिय योगदान द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, अशा प्रकारचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आणि नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम यापूर्वी झाल्याचे आठवत नसल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या सेवेला सन्मान देण्याची ही संकल्पना अत्यंत सकारात्मक असल्याचे सांगत उपस्थितांनी वन वरीक्षेत्र अधिकारी श्रीमती नीलिमा खोब्रागडे यांचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणा, परस्पर सहकार्य आणि कामाप्रती उत्साह वाढण्यास मदत होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी. डी. राठोड, आरती उईके, भाग्यश्री सराते, सुजाता अडगोपुलवार, चंद्रकला बोगा, पुरुषोत्तम सोयाम आणि के. डी. मडावी यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
ध्वजारोहण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि नव्या कर्मचाऱ्यांचे स्वागत अशा विविध उपक्रमांमुळे वन वरीक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष ठरला. अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

