
अमित कत्तीवार, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली(गडचिरोली) : जारावंडी परिसरात वाघाच्या वावरामुळे निर्माण झालेली भीती अखेर गंभीर घटनेत रूपांतरित झाली आहे. आज १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी जारावंडीपासून पूर्वेला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दोलंदा, ता. एटापल्ली येथील ५७ वर्षीय हरी बोहरण वड्डे हे घराशेजारील जंगल परिसरात शौचास गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी घरातून जंगलाच्या दिशेने गेलेले हरी वड्डे बराच वेळ झाला तरी घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी गावकऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरील परिस्थितीवरून वाघाने त्यांच्यावर हल्ला करून काही अंतरापर्यंत त्यांना ओढून नेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी परिसरात वाघाचा वावर ट्रॅप कॅमेऱ्यात आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून जारावंडी व परिसरातील गावांमध्ये वाघाकडून पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटना घडत होत्या. बैल, गायी आणि शेळ्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर नागरिकांकडून वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, आता थेट मनुष्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर दोलंदा, जारावंडी तसेच परिसरातील जंगलालगतच्या गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी एकट्याने जंगलात किंवा जंगलालगतच्या शेतात जाणे टाळावे, विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, वन विभागाने या घटनेची तातडीने गंभीर दखल घेऊन वाघाचा शोध घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे
इशारा देऊनही कारवाई नाही; आता १८ ऑगस्टला जारावंडीकरांचा चक्काजाम
दरम्यान, जारावंडी परिसरात वाघाकडून पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले होत असताना सामाजिक कार्यकर्ते मुकेश कावळे यांनी १९ जुलै रोजीच वन विभागाला निवेदन देऊन वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित स्वरूपाची ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अखेर आता मनुष्यावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून, यापुढे केवळ आश्वासन नको, तर वाघाच्या बंदोबस्तासाठी ठोस कार्यवाही हवी, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर दि. १८ ऑगस्ट रोजी जारावंडी परिसरातील नागरिकांकडून चक्काजाम आंदोलन करून वन विभागाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच वारंवार दिलेल्या इशाऱ्यांची दखल घेतली असती तर आजची परिस्थिती टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या आंदोलनापूर्वी कोणती ठोस पावले उचलते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

