
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरनार पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पूल आता मोठ्या प्रमाणात खचल्याचे व तुटल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर आणि कंत्राटदाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी शासन व संबंधित कंत्राटदारावर जोरदार टीका केली आहे. “हा शासनाचा चमत्कार की कंत्राटदाराचा धंदा? जनतेच्या पैशातून उभारलेला विकास की निकृष्ट दर्जाच्या कामांचा नमुना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोवासे यांनी या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासावी, दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जनतेच्या पैशाची झालेली हानी भरून काढण्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
अवघ्या तीन वर्षांत पुलाची झालेली दुरवस्था ही केवळ एका बांधकामाची बाब नसून सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर चिंता निर्माण करणारी घटना असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शासनाच्या विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

