
गडचिरोली|प्रतिनिधी:
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणात सपकाळ यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी आणि संबंधित पक्षाने त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी ज्येष्ठ नेते डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात डॉ. आत्राम म्हणाले की, एका महिलेविषयी अश्लाघ्य व अवमानकारक भाषा वापरणे हा केवळ त्या व्यक्तीचा अपमान नसून महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या सन्मानावर घाला आहे. राजकीय मतभेद असू शकतात, टीका होऊ शकते; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन महिलांचा अवमान करणारी भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आणि लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारे आहे.

“महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मान जपला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना समाजात कोणतेही स्थान नाही. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक नेत्याने आपल्या भाषेचे भान ठेवले पाहिजे,” असेही डॉ. आत्राम यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तातडीने कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सपकाळ यांनी महाराष्ट्रातील महिलांची माफी मागून आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदवत, महिलांच्या सन्मानाशी तडजोड कदापि सहन केली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

