
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली | दि. १ ॳॉगस्ट
“महसूल प्रशासन हे शासन आणि जनतेमधील विश्वासाचा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे प्रत्येक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्याने लोकाभिमुख, पारदर्शक, संवेदनशील आणि उत्तरदायी प्रशासनासाठी समर्पित भावनेने कार्य करावे,” असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, शासनाच्या विविध योजना, सेवा आणि निर्णय नागरिकांपर्यंत वेळेत व प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी महसूल विभागावर आहे. नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा, तत्परता आणि संवेदनशीलता जपत गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी. महसूल प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा उंचावण्यासाठी जबाबदाऱ्या पारदर्शकपणे पार पाडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रास्ताविकातून महसूल दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीला अधिक बळ देणे, उत्कृष्ट कार्याचा गौरव करणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानितांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, पोलीस पाटील सौ. लक्ष्मीछाया मुरलीधर मेश्राम (येवली), महसूल सेवक सत्यवान भोयर (अडपल्ली साजा), महसूल सहाय्यक रतन सहारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, तहसीलदार चेतन पाटील (मुलचेरा), उपविभागीय अधिकारी संपत खलाटे (चामोर्शी), वाहनचालक श्याम दहीकर, ग्राम महसूल अधिकारी रायल तलांडे (भामरागड), मंडळ अधिकारी पवन पिलारे (एटापल्ली) तसेच शिपाई संकेत आत्राम यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार वनीशाम येरमे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाखांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“वेळेत सेवा, पारदर्शक कारभार आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन हेच महसूल प्रशासनाचे ब्रीद असावे. जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने उत्तरदायित्वाने काम करणे आवश्यक आहे.” — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

